जेम्स ग्रँट डफ
जेम्स ग्रँट डफ | |
---|---|
जन्म नाव | जेम्स ग्रँट डफ |
जन्म |
८ जुलै, इ.स. १७८९ बॉन्फ, स्कॉटलंड |
मृत्यू |
२३ सप्टेंबर, इ.स. १८५८ इडन, स्कॉटलंड[१] |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
कार्यक्षेत्र | इतिहास, ब्रिटिश भारतीय लष्कर |
भाषा | इंग्रजी |
साहित्य प्रकार | इतिहास |
विषय | मराठ्यांचा इतिहास |
प्रसिद्ध साहित्यकृती | A History of the Mahrattas (मराठ्यांचा इतिहास) |
वडील | जॉन ग्रँट |
आई | मार्गारिट मिल्न |
पत्नी | जेन कॅथरिन आइन्स्ली |
अपत्ये | माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ग्रँट डफ |
स्वाक्षरी |
जेम्स ग्रँट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रँट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.[२]
सुरुवातीचे जीवन
[संपादन]जेम्स ग्रँट डफचा जन्म स्कॉटलंडमधील बॉन्फ या ठिकाणी किनकरडाइन ओनीलच्या 'ग्रँट' घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉन ग्रँट होते. जेम्स ग्रँट डफ याच्या वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच इ.स. १७९९ मध्ये त्याचे वडील वारले. त्याची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या 'डफ' या घराण्यातील होती. तिचा भाऊ इ.स. १८२४मध्ये वारला त्यामुळे भावाच्या मृत्यूनंतर डफ कुटुंबाची मालमत्ता मार्गारिटला मिल्न यांना मिळाल्यामुळे जेम्स ग्रँटला आईकडचे ‘डफ’ हे घराण्याचे उपनाम घ्यावे लागले.[३]
जेम्सच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेम्स व त्याची आई उत्तर स्कॉटलंडमधील ॲबरडीन या शहरात राहायला आले. जेम्सने तेथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्याच शहरातील मारिशल महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेम्सने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून सनदी सेवेत नोकरी करावी अशी त्याच्या आईची इच्छा होती. परंतु नोकरी मिळवण्यासाठी जो वेळ लागणार होता तो जेम्सला नको होता. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण सोडून त्याने आपला देश सोडला व भारताकडे प्रयाण केले.[४]
लष्करी कामगिरी
[संपादन]इ.स. १८०६ मध्ये ग्रँट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट (सैन्य प्रशिक्षणार्थी) म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल १८०७ मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. इ.स. १८०८मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या 'मालिया' किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रँट डफने शौर्य दाखवले. इ.स. १८१० मध्ये त्याची 'लेफ्टनंट' पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटणीचा (बटालियन) फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ मांडके, गिरीष. "ग्रँट डफ, जेम्स कनिंगहॅम".
- ^ अग्रलेख. "इतिहासाचे ध्यासपर्व". 2019-12-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-23 रोजी पाहिले.
- ^ कुलकर्णी पृ. २.
- ^ कुलकर्णी पृ. ३.
- ^ कुलकर्णी पृ. ४.
नोंदी
[संपादन]- कुलकर्णी, अ.रा. जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ.