आनंदीबाई धोंडो कर्वे
आनंदीबाई धोंडो कर्वे | |
---|---|
जन्म नाव | आनंदीबाई धोंडो कर्वे |
टोपणनाव | बाया कर्वे |
जन्म |
५ जून [१]१८६३ महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
२९ नोव्हेंबर १९५० हिंगणे आश्रम ,पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कथा, कादंबरी |
पती | धोंडो केशव कर्वे |
आनंदीबाई धोंडो कर्वे ऊर्फ बाया कर्वे (जन्मदिनांक/मृत्युदिनांक अज्ञात) या मराठी सामाजिक-शैक्षणिक कार्यकर्त्या होत्या. मराठी शिक्षणप्रसारक धोंडो केशव कर्वे हे त्यांचे पती होते.
जीवन
[संपादन]इ.स. १९४४ मध्ये महर्षी कर्वे यांच्या सहधर्मचारिणी आनंदीबाई कर्वे ऊर्फ बाया कर्वे यांचे ‘माझे पुराण’ प्रसिद्ध झाले.बालविधवेचे पूर्वजीवन वाटय़ाला आलेल्या आणि त्या अनुभवाने पोळल्यामुळे काहीशा रूक्ष, व्यवहारी आणि सकृद्दर्शनी अत्यंत हिशेबी वाटणाऱ्या, पण अंतःकरणात दीन-दुबळ्यांविषयी अपरंपार कळवळा असणाऱ्या आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. आधी बालविधवा म्हणून आणि नंतर पुनर्विवाहित म्हणून समाजाची उपेक्षा वाट्याला आली तरी लाचारी न पत्करता स्वतःच्या मर्जीनुसार जगणाऱ्या आनंदीबाईंच्या जीवनाची ही आगळीवेगळी कहाणी. माहेरची गरिबी आणि अगदी अजाण वयातच आनंदीबाईंना आलेले वैधव्य! वैधव्याचा पुरेसा अर्थही कळत नाही तोच त्यांची सासरी रवानगी झाली.
आपल्या स्थितीची खरी जाणीव आनंदीबाईंना झाली ती त्यांना विकेशा व्हावे लागले त्या वेळी. केशवपनाच्या करुण प्रसंगाचा आनंदीबाईंनी कथन केलेला वृत्तान्त कोणत्याही सहृदय वाचकाच्या काळजाला हात घालणारा. त्या म्हणतात-‘त्या काळी केस काढून घेण्यास तयार न होणाऱ्या विधवांचे फार हाल होत. त्यांना मार खावा लागे. दोराने बांधीत व इतरही बरेच हाल करीत, ते मला माहीत होते. आपण जर हट्ट केला, तर आपलेही असेच हाल होतील, अशी मला भीती वाटे. हट्ट न धरला तर पुढच्या भयंकर प्रसंगाच्या कल्पनेने अंगावर शहारे येत. झाले. एक दिवस ठरला. मला त्या दिवशी क्षेत्रावर नेण्याचे ठरले. पण क्षेत्रावर जाण्यास मी कबूल नव्हते व ते मी धीर करून स्पष्ट सांगितले. ‘‘तुम्हाला इथंच काय करायचं ते करा. क्षेत्राबित्रावर मात्र मी येणार नाही.’’ पुढे त्या म्हणतात- "विधवा मुलीची इतकी विटंबना का व्हावी हे मला उमजेना. मी असे काय पाप केले? मी तो सबंध दिवस रडून घालवला. पण उपयोग काय त्याचा! अशा कितीतरी मुली आतापर्यंत माझ्यासारख्या रडल्या असतील, पण त्याचे समाजाला काय?" हा प्रसंग एकदा यायचा असता तर त्याचे दुःख काही दिवसांनी तरी विसरले असते. पण दर महिन्याला त्याची पुनरावृत्ती होई. आधी विधवा म्हणून आणि नंतर कर्वेशी पुनर्विवाह केला म्हणून लोकांची सतत अवहेलनाच वाटय़ाला आली, तरी स्वतःतल्या खमकेपणामुळे आनंदीबाई लोकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करू शकल्या. प्रथम रमाबाईंच्या प्रोत्साहनाने शारदासदनात आणि नंतर कर्वेच्या प्रोत्साहनामुळे हुजूरपागेत त्यांचे शिक्षण झाले तरी स्वतःच स्वतःला घडविण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली ती सासुबाईंकडून मिळालेल्या आणि आनंदीबाईंनी कानात साठवून ठेवलेल्या जीवनशिक्षणातूनच.
स्त्री-शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, स्वतंत्र संस्था उभारून त्या संस्थांच्या वाढीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या महर्षी कर्वेचे एक पाऊल सदैव घराबाहेर असे. त्यांच्यासमवेत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन संस्थेसाठी काही करण्याचे भाग्य आनंदीबाईंच्या वाटय़ाला आले नाही तरी एका कलंदर समाजसुधारकांबरोबर संसार करता करता अनेक निराधार स्त्रिया आणि अनाथ मुलांचा व्याप त्यांनी जिकिरीने सांभाळला. पुढे छोटी-मोठी कामे करून आश्रमासाठी पैसा साठवणे आणि देणग्या गोळा करणे हा एकच ध्यास त्यांनी अखेपर्यंत बाळगला. आयुष्यभर स्वतः काटकसर करून संस्थेसाठी हातात झोळी घेऊन हिंडणाऱ्या आनंदीबाईंचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक चमत्कारिक रसायन! अत्यंत स्पष्टवक्त्या, परखड स्वभावाच्या, प्रसंगी कटू बोलून अगदी जवळच्यांच्याही काळजाचा तुकडा तोडणाऱ्या, पण तितक्याच पारदर्शी, प्रामाणिक.. लोकनिंदेची पर्वा न करता अंतर्मनाचा कौल मानून त्याप्रमाणे आचरण करण्याचे धाडस दाखवणाऱ्या व स्वतंत्र बाण्याच्या आनंदीबाईंचे संपूर्ण जीवन म्हणजे खुले पुस्तक आणि त्यांचे जीवनचरित्र म्हणजे वरच्या विद्रूप पापुद्रय़ाच्या आड असणारे निवळशंख पाणी.
बालपणी दारिद्रय़ाचे चटके सोसून आणि पुढे वैधव्याचे भोग वाटय़ाला येऊनही नशिबाला दोष देत रडत राहण्याऐवजी हसत हसत दुर्दैवाला सामोरे जाण्याची एक नितांतसुंदर जीवनशैली आनंदीबाईंनी संपादन केली होती. उतारवयात स्वतःला परावलंबी जिणे जगायला लागू नये म्हणून उरस्फोड करणाऱ्या मुलाकडे आफ्रिकेला गेल्या तरी तिथेही शांत न बसता आश्रमासाठी भाऊबीज फंड उभा करणाऱ्या आनंदीबाईंचे समर्पित असलेले बहुरूपी आयुष्य हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होय. अशा चाकोरीबाहेरच्या जीवनाचे अत्यंत रसभरीत, प्रांजळ निवेदन म्हणजे आनंदीबाईं होत.
- ^ महर्षी कर्वे यांचे आत्मवृत्त isbn 987-81-920642-9-1